माहेरच्या वैद्याचं कौतुक


नमस्कार, फक्त पुण्यातच असू शकतो अशा छान संध्यासमयी आपण जमलो आहोत. शंतनूच्या पुस्तकाच्या निमित्ताने. महिन्याभरापूर्वी त्याने फोन केला होता. पुस्तकाचं नाव पाळीमिळी गूपचिळी असंच हवंय, पण... पण अनेक लोकांनी त्याला ते नाव नको, पाळी हा शब्द कसा टॅबू आहे, वाचक दुकानात किंवा ग्रंथालयात जाऊन पुस्तक मागताना लाजतील, वगैरे वगैरे भीती घातली होती. तेच नाव योग्य आहे, असं त्याला मनापासून वाटत होतं. तुला काय वाटतं, असं त्याने विचारलं. म्हटलं, नाव हेच हवं. दुमतच नाही. नाव बदलणं म्हणजे एका दुष्टचक्रासारखं हाेईल. लोकांच्या मनातले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करताना आपण नकळत त्यालाच पुष्टी दिल्यासारखं होईल. त्याच्याशी बोलतानाच पुलंच्या हसवणूकचं मुखपृष्ठ डोळ्यांसमोर आलं अचानक. म्हटलं, पा आणि आ, असा खेळ करता येईल. त्याला तो पटला आणि आज पुस्तक त्याच नावाने आपल्यासमोर आहे. ही चर्चा सुरू असताना मला चीनी कम चित्रपटातलं एक दृश्य आठवत होतं. अमिताभ बच्चन तबूला भेटायला जाणार असतो, त्याआधी निरोध विकत घ्यायचा असतो त्याला. त्यासाठी तो औषधांच्या दुकानात जातो तिथली त्याची गडबड, चलबिचल आपल्या या पुस्तकांच्या वाचकांच्या चेहऱ्यावर मला दिसायला लागली, आणि हसू फुटलं. खंतही वाटली किंचितशी. निरोध, सॅनिटरी नॅपकिन विकत आणायचं म्हटलं तरी जर आपण असे शरमलेले असू, पाळी हा शब्द उच्चारायलाही आपली जीभ धजावत नसेल, तर आपल्या सामाजिक स्वास्थ्याचं काही खरं नाही ना?
शंतनूच्या लेखांचं मोल या सामाजिक परिस्थितीमुळे अधिकच वधारतं. तो स्त्रीच्या शरीराला जे काही आजार होऊ शकतात, त्यात ज्या काही समस्या निर्माण होऊ शकतात त्यांबद्दल मोकळेपणाने लिहितो. कोणतंही लिखाण चांगलं आहे, असं आपण कधी म्हणतो, तर ते मुळात वाचनीय असायला हवं. कोणताही लेखनप्रकार असो, ललित, कथा, कादंबरी, कविता, निबंध, सुरुवात केल्यानंतर काही मिनिटांत त्याने वाचकाची पकड घ्यायला हवी. आणि शेवट गाठेपर्यंत त्याची उत्सुकता, त्याचा वाचनातला रस कायम राहायला हवा. शंतनूचे सगळे लेख या कसोट्यांवर खरे ठरतात. त्याची शैली खुसखुशीत आहे, प्रसंगी वाचकाला चिमटेही काढतो तो हलकेच. पीसीओडीवरच्या लेखात तो म्हणतो, प्रत्येक बाईच्या शेजारी एक बाई असते. ही शेजारची बाई म्हणते, बापरे, तू गोळ्या घेतेस? हे वाचून मी स्वत:ला एक चिमटा काढला, आणि म्हटलं, परत कोणाला विचारशील का असं, बापरे तू गोळ्या घेतेस. थोडं सहन करायचं, किंवा पथ्य, व्यायाम या गोष्टींनी सुधारतंय का पाहायचं, गोळ्या घेणं टाळायचं, ही माझीही विचारसरणी. त्याचे लेख पुरवणीसाठी घेताना मी पहिल्यांदा वाचते तेव्हा अनेकदा खळखळून हसलेय. कुटुंबनियोजन, लग्नाची पहिली रात्र या विषयावरचा त्याचा लेख हा खुसखुशीत विनोदाचा उत्तम नमुना आहे. डाेंबलाचे गर्भसंस्कार या लेखातून तो थेट विषयाला भिडतो आणि चूक ते चूक, हे सुनावतो. आरोग्यविषयक लिखाण रंजक कसं असू शकतं, याचं हे पुस्तक म्हणजे उत्तम उदाहरण. पुस्तकाच्या उपयुक्ततेबद्दल तर बोलावं तितकं कमीच. आमच्या दैनिक दिव्य मराठीच्या मधुरिमा या महिलांसाठीच्या साप्ताहिक पुरवणीत दर पंधरा दिवसांनी हे लेख प्रसिद्ध होतात. फेसबुकवर शेअर केला लेख की, तो अनेक जण वाचतात, शेअर करतात. आमची आवृत्ती मुंबईपुण्यात नाही, तुलनेने लहान शहरांमध्ये आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र इथल्या शहरांमधले स्त्रीरोगतज्ज्ञ या लेखांच्या प्रती काढून आपापल्या दवाखान्यांमध्ये रुग्णांना वाचायला ठेवतात. व्हाॅट्सअॅपवरही लेख प्रचंड फिरतात. त्यातल्या अनेक गोष्टी सर्वसामान्य वाचकाला वरवर माहीत असतात, ऐकलेल्या असतात, पण त्यातले तपशील तेही वैद्यकीय बोजड किंवा तांत्रिक भाषा न वापरता लिहिणं हे शंतनू खुबीने जमवतो. कारण भाषा अवघड वाटली, डोक्यावरून गेली तर लिखाण वाचनीय राहात नाही. शंतनूतल्या लेखकाला हेे निश्चितपणे माहीत आहे की, तो ज्या वाचकांसाठी हे लिहितोय, त्यांच्यासाठी वैद्यकीय प्रबंधांसाठी वापरली जाणारी भाषा वापरणं योग्य नाही. परंतु विषय सुलभ करतानाही त्यातलं वैद्यकशास्त्र शाबूत असतं, त्याला कुठेही धक्का पोचलेला नसतो.
शंतनूच्या मराठीवरच्या प्रभुत्वाचं कौतुक केलेलं त्याला आवडत नाही, कारण मराठी मातृभाषा असलेल्या व्यक्तीने चांगलं मराठी लिहिलं तर त्यात काय विशेष असं त्याला वाटतं. हा त्याचा नम्रपणा आहे, इतकंच मी सांगू शकते. पुरवणीसाठी येणारे हजारो लेख मी आतापर्यंत वाचले आहेत, त्या बळावर मी हे प्रमाणपत्र त्याला देतेय.
हे सगळं कौतुक तुम्हा सर्वांना जरा जास्त वाटेल. पण माझा नाइलाज आहे, कारण तो वाईचा, माझ्या माहेरचा वैद्य आहे.
धन्यवाद.
( दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सभागृहात झालेल्या डाॅ. शंतनू अभ्यंकर यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात केलेलं भाषण.)

Comments