कोल्हापूरची खाद्ययात्रा Kolhapur Foodies

दोन दिवस कोल्हापुरात होतो. मुंबईतल्या विसर्जनाचा त्रास एकदा तरी टाळावा म्हणून मी गेली दोनतीन वर्षं बाहेर पडते या दिवसांत. या वेळेस दोनच दिवस जाता येणार होतं. मग कोल्हापूरला जायचं ठरवलं. सह्याद्री एक्स्प्रेसची कन्फर्मड तिकिटंही मिळाली जायचीयायची. या भटकंतीत प्रेक्षणीय स्थळांइतकीच महत्त्वाची आणि अविस्मरणीय होती खादंती.
airbnbवरनं एक फ्लॅट बुक केला, त्याच इमारतीत मैत्रिणीची आई राहाते तिने सुचवला होता. या काकू निवृत्तीनंतर वेळ जावा म्हणून डबे करून देतात, किंवा पदार्थांच्या आॅर्डर घेतात. झेपेल तितकंच करतात, त्यांचा वेळ छान जाईल इतकंच काम घेतात. त्यांच्या हाताला उत्तम चव आहे याची प्रचिती पोचलो त्या सकाळीच आली. गरमागरम भाजणीचे वडे खाऊन. हाताला एक थेंबही तेल नव्हतं, खुसखुशीत वडे तोंडात विरघळत होते. मुंबईला यायच्या आधीही त्यांच्याचकडे खिचडी खाल्ली, मुगातांदळाची. त्यातही त्यांनी फक्त खिचडी कशी द्यायची म्हणून घोसाळ्याची भजी काढली होती. काकूंकडे पुरणपोळ्या, चकल्या, रोजचं जेवण यांच्या आॅर्डरी असतात, इडलीचं पीठसुद्धा नेतात त्यांच्याकडनं. छोटा इलेक्ट्रिकवरचा रगडा आहे, त्यात केलेलं असल्यानं इडल्या छान फुगतात.
खिद्रापूर
वडे खाऊन उदयन, त्याच्या दोघी लेकी आणि आम्ही दोघी गेलो खिद्रापूरचं प्राचीन कोपेश्वर मंदिर पाहायला. तिथनं जेवायला अर्थात नरसोबाची वाडी गाठली. सोमण यांच्या खाणावळीत जेवा, असं काकांनी आवर्जून सांगितलं होतं. तिथे गेलो. २४ लोक बसतील अशी दोन बाकडी आणि टेबलं. आम्ही बसल्यावर ताटं, वाट्या आली समोर. आणि बघता बघता काेशिंबिरी, लोणची, तीन भाज्या, वाफाळता भात, वरण, लिंबू, आमटी यांनी ताट भरून गेलं. भात संपतोय तोच गरमागरम घडीची पोळी. एका वाटीत बासुंदी, एकीत ताक. बासुंदीच्या जोडीला टम्म फुगलेली पुरी. वर मसालेभात. आणि अतिशय प्रेमळ आग्रहाने वाढणं. चविष्ट जेवण एकदम. खाऊन दमलो आम्ही. (माणशी फक्त ११० रुपये.) उदयनने तर जाहीर केलं की, आता गाडी कोणीतरी चालवा, मी झोपणार!
त्या दिवशी संध्याकाळी कोल्हापुरात रिक्षाने फिरलो. अंबाबाईचं दर्शन घेतलं. लेकीला मित्राने सांगितलं होतं, वामन गेस्ट हाउस किंवा नीलेशमध्ये जेव, मांसाहारी जेवण छान असतं. आमचं नशीब असं की, गणपतीचे पाच दिवस ही दोन्ही हाटेलं बंद. मग पुन्हा रिक्षावाल्याला म्हटलं, एखाद्या चांगल्या ठिकाणी ने. त्याने एका छोट्याशा खाणावळीसमोर रिक्षा थांबवली. तिथे चिकन, पांढरातांबडा रस्सा आणि गरमागरम पोळ्या समोर आलं. दर तीन मिनिटांनी येऊन विचारत होता तिथला माणूस, पोळी आणू, भात आणू,रस्सा हवाय. दोघी पोटभर जेवलो, फक्त १०० रुपयांत.
नादखुळा मिसळ
दुसऱ्या दिवशी नादखुळा मिसळ. शिवप्रसाद हा अंगतपंगतवर झालेला शेफ मित्र. त्याची ही खास शिफारस. मिसळ भारी होती, उगीचच तिखट नाही की तेलकट तर्री नाही. कोल्हापुरात मिसळीबरोबर पाव नाही, तर ब्रेडच्या स्लाइस मिळतात हे ऐकलं होतं. इथला ब्रेड तर पावाच्या तोंडात मारेल असा. खूपच आवडलं हे प्रकरण.
पन्हाळ्यावरची पिठलंभाकरी
तिथून शिव, त्याची लेक, असे आम्ही चाैघं गेलो पन्हाळगडावर. सोनालीने बशीर नावाच्या स्टाॅलवाल्याचा नंबर दिला होता, त्याला फोन करून सांगितलं तासाभरात येतोय, पिठलंभाकरी खायला. फिरून आलो. बाकी सगळे स्टाॅल तीनसाडेतीनला बंद झाले होते कारण त्या दिवशी गौरीगणपती विसर्जन होतं. गरमगरम पिठलं, भाकरी, वांगं, लोणी असं ताट. छान गारवा होता. फिरून भूक लागली होती. त्या हवेत असं जेवण समोर आल्यावर काहीही न बोलता तुटून पडलो. निव्वळ अहाहा. तिखट हीच पदार्थाची चव असते, असा समज हल्ली पसरलेला दिसताे, तो इथे सुदैवाने दिसला नाही. मसाले, खास त्या भागातली वांगी, यांची चव पदार्थांना होती. दोघं जेवलो, दीडशेच्या कमी बिल झालं.
पन्हाळ्यावरचं वांगं
कोल्हापुरात परतल्यावर रंकाळ्यावर चक्कर मारली. तिथली सुप्रसिद्ध भेळ खाल्ली. भेळ हा माझ्या फार आवडीचा पदार्थ नाही, त्यामुळे मी पास दिला. लेकीला आवडली. तिथे प्रियदर्शनी वड्याचा ट्रक होता. एक रांग बायांची, एक पुर्षांची. शिस्तीत वाट पाहात होते लोक वडा मिळायची. ड्वाळे पाणावले म्हणायचा हाच तो क्षण. बाकीच्याही स्टाॅलवर बऱ्यापैकी गर्दी होती, गौरींचं गोडाधोडाचं जेवून विटलेली मंडळी तिखटामिठावर ताव मारत होती.
रात्री गाडी पकडली. शिव, गौरी आणि त्यांची लेकरं निरोप घ्यायला आले होते. मी म्हटलं या मुंबईला. तर गौरी म्हणते, आम्ही येऊ हो, पण तुमच्याकडे वेळ आहे का आमच्यासाठी? तुम्ही म्हणाल, या दिवसभर फिरून, मी आॅफिसला निघते, रात्री भेटू.
आईशप्पथ, हे ऐकून खूप वाईट वाटलं कारण ते बऱ्याच अंशी सत्य होतं. कोल्हापुरात आम्हाला तिथल्या मित्रमंडळींनी (सगळ्यांशी ओळख फेसबुकवरची.) जितका निवांत वेळ दिला, तितका मुंबईत मी किती जणांना किती वेळा देऊ शकेन, याची माझी मलाच खात्री नाही. पण बदलायला हवंय हे नक्की.
(pics credit - Shiv Medhe)

Comments