निरोप

कविताची आणि तुम्हा सर्वांची ओळख पाच वर्षांपूर्वीपासूनची. बदलापूरची बखर हे अस्सल आधुनिक ग्रामीण जीवनाचं चित्रण करणारं सदर २०१३साली २७ सप्टेंबर रोजी सुरू झालं होतं. सुर्वात असंच त्याचं शीर्षक होतं. बदलापूर या गावातल्या इरसाल व्यक्तींचं अत्यंत जिवंत रसरशीत वर्णन आणि आज महाराष्ट्रातल्या कोणत्याही लहान वा मध्यम आकाराच्या गावांमध्ये राहणाऱ्यांना आपलंसं वाटेल अशा त्यातला घटना तिने खुबीने रंगवल्या होत्या. दोन वर्षं ती हे सदर चालवत होती. असंख्य वाचक तिला मेलवर वा फोन करून हे गाव कुठेय, त्यातले कुंथलगिरीकर महाराज खरंच आहेत का, आम्हाला त्यांना कसं भेटता येईल, असं विचारत. यापेक्षा मोठी पावती काय असू शकते कोणत्याही लेखकासाठी?
गेल्या वर्षीच्या जानेवारीपासून कविता स्त्री जीवनाचा इतिहास आपल्या समोर मांडत होती. शेकडो वर्षांचा काळ काही शब्दांत मांडत असली तरी त्यासाठी ती प्रचंड वाचत होती, नोंदी काढत होती. डिसेंबरपर्यंतचे लेख तिने पाठवून दिलेले आहेत, इतकं शिस्तबद्ध लिखाण ती करत होती. लिखाण हेच तिचं पोटपाण्याचं साधन होतं. पूर्णवेळ लेखक असणाऱ्या व्यक्ती भारतातल्या कोणत्याही प्रांतात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच असतील, कविता त्यांतलं एक महत्त्वाचं नाव होतं. तिच्या ब्र आणि भिन्न या कादंबऱ्या स्त्रीवादी भूमिकेतून मांडलेल्या. ती कट्टर स्त्रीवादी होती, पण कडवट नव्हती. कुहू हे बहुमाध्यमी पुस्तक मुख्यत: मुलांसाठी होतं पण मोठ्यांनाही अर्थात ते आवडणारंच. मराठीतला हा असा पहिलाच प्रयोग. इतर भाषांमधून मराठीत अनुवादात तिचा हातखंडा होता, तिचं शब्दभंडार प्रचंड होतं. ती एकाएका शब्दावर मेहनत घ्यायची. तिने केलेले अनेक अनुवाद प्रसिद्ध आहेत. कविता हे तिचं नाव कसं यथायोग्य होतं, अशा उत्कट, सखोल, चिंतनात्मक कविता तिने लिहिल्या. तिने कविताच केल्या असत्या तरी चाललं असतं, इतकं सामर्थ्य त्यांमध्ये होतं. कादंबऱ्या लिहिताना तिने अनेक वर्षं त्यांवर काम केलं होतं, त्यासाठी प्रचंड पायपीट केली होती, शेकडो माणसांना भेटली होती, त्यांचं आयुष्य प्रत्यक्ष जगली होती. आदिवासी आणि वेश्या, अशा परीघावरच्या माणसांशी तिने स्वत:ला जोडून घेतलं होतं. एक नाटक काय ते तिनं लिहिलं नाही, बाकी साहित्याचे बरेचसे प्रकार तिने हाताळले आणि त्यांवरचं प्रभुत्वही सिद्ध केलं. तिचा ब्लाॅगही कायम अद्ययावत असे. हे सगळं वयाच्या केवळ ५१व्या वर्षापर्यंत तिने साध्य केलं होतं. एखादी प्रसिद्ध व्यक्ती गेली की, तिच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असं म्हणण्याचा प्रघात आहे. बहुआयामी कविताच्या बाबतीत ते शब्दश: खरं आहे. अनेक लेखनप्रकल्पांची मूलभूत तयारी तिने करून ठेवली होती, त्यासाठीच्या संशोधनसाहित्यात बराच पैसा गुंतवला होता.
विनोद हाही तिच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग होता, ती इतकी खळखळून हसायची की, ते हसू इतरांच्याही ओठावर यायचंच. तिच्यातलं लहान मूल तिने दडवून ठेवलं नव्हतं, ते कायम काहीतरी खोड्या काढत असायचं, खट्याळपणा करत असायचं.
एका मोठ्या अपघातातनं ती वाचली पण तिच्या शरीरावर त्याचा मोठा आघात झालेला होता. अशा काहीशा नाजूक शरीरातला मेंदू मात्र अव्याहत विचार करणारा, नव्याची आस धरणारा, सर्जनाकडे धावणारा होता. ती लेखिका म्हणून प्रसिद्ध झाली असली तरी मूळची ती आर्टिस्ट. चित्रकला हा तिचा आवडीचा विषय होता. कॅनव्हास आणि कापड या दोन्हींवर तिचा ब्रश उत्तम चालत असे. स्वयंपाककला हा तिचा आणखी एक प्रेमाचा विषय. ती स्वयंपाकघरात असंख्य प्रयोग करत असे. तिची पाककृतींचीही पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत.
गेल्या वर्षी याच दिवसांत सोशल मीडियावर काही व्यक्तींनी तिची बदनामी करण्याची मोहीम हाती घेतली होती. अनेक दिवस दुर्लक्ष करूनही प्रकरण मिटत नाही म्हटल्यावर मात्र तिने न्यायालयाकडे धाव घेतली होती. दोन वेगळे खटले प्रलंबित आहेत. सोबतीची खात्री या नावाने तिने ही मोहीम सोशल मीडियावर लावून धरली होती आणि तेव्हा अनेक तथाकथित जवळच्या मित्रमैत्रिणींनी सोबत न दिल्याने ती प्रचंड व्यथितही झाली होती. परंतु आपण न्यायालयात गेलोय, एक ना एक दिवस आरोपींना शिक्षा होईल, याची तिला खात्री होती. या निमित्ताने सोशल मीडियावर स्त्रियांचा कसा छळ होताे, हेही उघडपणे बोललं जाऊ लागलं, हे मोलाचं. या सगळ्या प्रकरणाचाही भयंकर मानसिक त्रास तिने भोगला होता.
कविताने फार पूर्वीच, तिच्या अपघातानंतर, तिचं कायदेशीर मृत्यूपत्र करून ठेवलं होतं. यंत्रांच्या साह्याने मला जगवत ठेवायचं नाही, असं तिने त्यात स्पष्ट नमूद केलं होतं. इतकी विचारांची आणि ते प्रत्यक्ष कृतीत आणण्याइतकी स्पष्टता दुर्मीळच.
कविता तिच्या सदरातल्या लेखांच्या माध्यमातून डिसेंबरपर्यंत आपल्याला भेटतच राहील. नंतरही तिची अनेक पुस्तकं, कविता, चित्रं यातनं ती आसपास असेलच. तिची आठवण आपणच जागती ठेवू शकताे.

तुझी सगळी तगमग
मुरवून घेईन मी तनामनात
आणि मग
तुझ्या मुठीतून निसटून जाईन
हळूहळू वाळूसारखी
ओघळेन तुझ्या डोळ्यातून नकळत
वाहणाऱ्या पाण्यासारखी

मी जाण्यापूर्वी हसतमुख
एक क्षणभर समोर उभा रहा माझ्या
निरोप दे
चिमूटभर शांततेचं बोट
माझ्या कपाळावर टेकव.

- कविता महाजन
(कविता महाजन मी संपादित करत असलेल्या मधुरिमा या पुरवणीत सदर लिहीत. एक सदर दोन वर्षं चाललं, दुसरं सुरू असतानाच त्यांचं अकाली निधन झालं. त्यांना वाहिलेली ही आदरांजली.)

Comments