मनुष्यरूपातली स्त्री

भारतात सगळ्या प्रांतांत एकाच रूपात साजरा केलेला सण म्हणजे नवरात्र उद्या सुरू होतोय. या नऊ दिवसांत सगळीकडे स्त्रीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. त्या निमित्ताने सगळ्या प्रसिद्धीमाध्यमांमधून या सगळ्यावर चर्चा होईल, त्यातून अनेक कर्तबगार महिलांची ओळख करून दिली जाईल. नवरात्राच्या काळातच अनेक महिलांवर बलात्कार होतील, त्यांचा मानसिक/शारीरिक छळही होईल. त्याच्याही बातम्या वाचनात येतील. एकीकडे, अमेरिकेत वर्षभरापासून गाजत असलेल्या मीटू #metoo या मोहिमेसारख्या, भारतातल्या लैंगिक छळाविषयीच्या बातम्या आणि सोशल मीडियावरच्या पोस्ट्स तीनचार दिवसांपासून गाजत आहेत. दुसरीकडे, दिनकर मनवर यांच्या एका कवितेतल्या ओळींवरून रणकंदन माजलंय. त्यावरच्या चर्चांमधनंही अजून पुरुष स्त्रीला, तिच्या शरीराला त्यांच्या मालकीचं समजतात, हेच दिसतंय.

भारतात आपण विविधतेत एकता असं लहानपणापासून शिकत आलोय, हीच ती विविधता का, असं वाटू लागतं. हे सगळं नकारात्मक वाटू शकतं, पण त्यावर चर्चा करणं, बोलत राहाणं, त्यातल्या वेगवेगळ्या लहानमोठ्या मुद्द्यांचे उल्लेख करणं, आवश्यक आहे. कारण हे वास्तव असलं तरी फक्त हेच वास्तव नाही, हे तरुण पिढीला कळायला हवंय. काळजी घेणं, सुरक्षित राहाणं, या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, पण निरोगी सुदृढ आनंदी नातीही स्त्रीपुरुषांमध्ये शक्य आहेत, हे त्यांच्या मनावर ठसवायला हवंय.

अापल्या सहवासात येणाऱ्या, परिचय होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आपलं नातं तयार होतंच असं नाही, पण तसं तयार होणारच असेल तर ते सकारात्मक करणं ही दोघांची जबाबदारी आहे, दोघांवर अवलंबून आहे, ते सहज शक्य आहे हे आता शाळामहाविद्यालयांत असणाऱ्या मुलामुलींना कळायला हवंय. ती जाणीव आपण मोठेच करून देऊ शकतो. चित्रपट, टीव्हीवरच्या मालिका, फेसबुक, ट्विटर, व्हाॅट्सअॅप यावर जे असतं ते समाजाचं प्रतिबिंबच असतं, पण काही टक्केच. धर्म, राजकारण यांची एक जागा आपल्या आयुष्यात आहे, पण मर्यादित. त्यापेक्षा वेगळं वास्तवही असतं, असायला हवं हे सांगायची हीच योग्य वेळ.

नवरात्रात स्त्रीचं देवीरूप पूजण्यापेक्षा तिचं मनुष्यरूप समजून घेणं, ते स्वीकारणं अधिक मोलाचं ठरेल.

Comments