image from the internet |
माझा तरुण मित्र आशय गुणेने फेसबुकवर हा प्रश्न विचारला आहे.
''ट्विटर वर सुरू असलेल्या #MeToo बाबत मला एक प्रश्न पडला आहे. जर उद्या एखाद्या मुलीने माझ्यावर सूड म्हणून एका दुसऱ्या मुलीला चॅट मध्ये मी तिच्या जवळ जायचा प्रयत्न केला किंवा तिला स्पर्श केला, मिठी मारली असं लिहिलं. तो स्क्रीनशॉट सोशल मीडियावर प्रकाशित केला आणि 'आशय गुणे' हे नाव अधोरेखित केलं. आणि पुढे मिळणाऱ्या retweet किंवा shares द्वारा ती बदनामी वाढवली. तर, इथे माझ्या लिस्टमध्ये असलेल्या, मी कसा आहे हे माहिती असलेल्या, माझ्याशी संपर्कात आलेल्या स्त्रिया, मुली, मुलं, पुरुष माझ्या बाजूने उभी राहतील का? मतं मांडायच्या आधी मला एकदा विचारतील का? की मला लेबल लावतील? आणि मुख्य म्हणजे, पर्सनल चॅटचा स्क्रीनशॉट पुरावा म्हणून मान्य करतील का?''
हे वाचून मी काहीशी चिंतेत पडले. आतापर्यंत असा विचारच नव्हता केला.
त्याला हे उत्तर दिलं ''कोणताही पुरुष ९९ जणींशी सभ्य पण एका महिलेशी असभ्य वागू शकतो, यावर माझा विश्वास आहे, अनुभवाअंती मिळालेला. म्हणजे असा आरोप झालेले पुरुष त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वजणींशी असे वागत नसावेत. त्यामुळे त्यांना जवळून ओळखणाऱ्या अनेकींना या आरोपांमध्ये तथ्य वाटणार नाही. मुद्दाम कोणी खोडसाळपणाच केला तर तो तक्रार केल्यानंतरच्या चौकशीत उघड होईलच. खोटं बोलणं आणि ते निभावणं कठीण असतं. पण तू किंवा इतर कोणीही पुरुष असं वागणारच नाही, याची खात्री मी देऊ शकणार नाही, देऊ धजावणार नाही, इथवर मी गेल्या काही वर्षांत पोचले आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे, मान्य. पण मी एखादा पुरुष किंवा एखादी स्त्री १०० टक्के खरं/खोटं बोलतेय, असं मी त्या घटनेची साक्षीदार असेन तरच म्हणू शकेन ना? हे सगळं अतिशय खेदजनक आहे हे निश्चित.''
अशी एखादी तक्रार ऐकली की अनेक पुरुषांचं अशी प्रतिक्रिया येते की, आम्ही त्याला इतकी वर्षं ओळखतो, तो इतका मोठा लेखक/अभिनेता/गायक ... (अनुभवानुसार गाळलेल्या जागा भरा) आहे, तो असं करूच शकत नाही. अरेच्चा. ओळखीतल्या व्यक्तीचं नाव आलं म्हणून इतका धक्का का बसतो बरं? अमुक एक माणूस तसं वागू शकणार नाही, असं इतरांना वाटत असतं. एखाद्या स्त्रीशी ती व्यक्ती चुकीच्या पद्धतीने वागलेले असूच शकते. तुम्ही तसं पाहिलेलं नसतं म्हणून लगेच त्या आरोप करणाऱ्या स्त्रीवर शेरेबाजी कशाला? मी अशा प्रकारचा लैंगिक छळ किंवा sexual moves म्हणू, किंवा cornering अनेकांकडून सहन केलाय, त्यातले बहुतेक लोक समाजात प्रतिष्ठा वगैरे असलेलेच होते. कोणताही पुरुष माझ्याशी, त्याच्या आईशी, बहिणीशी, नात्यातल्या स्त्रियांशी कसा वागतो, यावर तो त्याच्या आॅफिसातल्या सहकारी स्त्रीशी किंवा एखाद्या अपरिचित बाईशी एखाद्या विशिष्ट परिस्थितीत कसा वागेल याचा अंदाज बांधणं चुकीचं आहे, असं माझा आजवरचा अनुभव सांगतो.
पण परिस्थिती अवघड होत चाललीय हे निश्चित. खरंखोटं यांमधली रेषा इतकी पातळ झालीय, ती इकडेतिकडे सरकतेही प्रसंगी. काही खोटे आरोप होत असतीलही. परंतु ते अपवाद, नियम नव्हेत. जसं सगळ्या कायद्यांचा गैरवापर होत असतो, तसंच हे. पण या सगळ्यामुळे वातावरण गढूळतंय, हे लक्षात येतंय. स्त्री व पुरुषांमध्ये निकोप, निरोगी संबंध किंवा interaction शक्य आहे, ती बऱ्याच अंशी तशीच असते. पण अशाही व्यक्ती आहेत ज्या प्रामुख्याने आपल्या प्रतिष्ठेचा, सत्तेचा, अधिकाराचा गैरवापर करतात. प्रत्येक वेळी मुली/महिलांना तिथल्या तिथे झटकणं शक्य होत नाही, अनेकदा फक्त काहीतरी चुकतंय इतकंच कळत असतं. कालांतराने लक्षात येतं की, ते ठार चुकीचं होतं. मग तेव्हा वाटतं, आता आवाज उठवून काय उपयोग. अनेकदा आवाज उठवून तो अनेकांनी कानाआडही केलेला असतो. मग नंतर कधीतरी परिस्थिती सकारात्मक वाटते, आपलं म्हणणं कोणी ऐकेल अशी शक्यता दिसते, तेव्हा या घटनेला वाचा फोडली जाते.
आपल्याकडे आत्ता हे लोण पसरलंय. काल काही खूपच मोठी नावं आरोपी म्हणून समोर आलीत. काही जणांना कदाचित भीती वाटू लागली असेल की, आपलंही नाव कोणी उघड करतंय की काय. काही जणींच्या जुन्या कडवट आठवणी डाेकं वर काढतील. काही काळ तरी या घुसळणीत जाईलसं दिसतंय. बायांनो काळजी घ्या, पुरुषांनो, तुम्हीही काळजी घ्या कसं वागताय याची, यापलिकडे काही म्हणता येईलसं वाटत नाही.
Comments
Post a Comment