#metooचं वादळ

#metoo या नावाने अमेरिकेत सुरू झालेली, लैंगिक अत्याचारांना वाचा फोडणारी चळवळ आज ना उद्या भारतापर्यंत पोहाेचणारच होती. भारतातल्या महिलांना त्यांच्यावर कामाच्या ठिकाणी झालेल्या अत्याचारांबद्दल, छळाबद्दल आवाज उठवावासा वाटला, याचं स्वागत करायला हवं. गेल्या आठवड्यात अभिनेता नाना पाटेकर याने १० वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या सेटवर कसा छळ केला होता याची अभिनेत्री तनुश्री दत्ताने जाहीर वाच्यता केली आणि भारतीय महिलांनी इतके दिवस दाबून ठेवलेल्या अनुभवांवरचं झाकण उघडलं. यात मुख्यत्वे पत्रकार महिलांचा समावेश आहे. अजून बाॅलीवूडमधल्या फार कोणी तोंड उघडलेलं नाही. या पत्रकारांनी आरोप केलेल्या व्यक्तींमध्ये अनेक ज्येष्ठ/प्रतिष्ठित लेखक व पत्रकार आहेत, खेरीज एका विद्यमान मंत्र्याचाही समावेश आहे.

गेले काही दिवस प्रसिद्धिमाध्यमांमधून याची चर्चा होऊ लागल्यावर आताच का या बायका बोलायला लागल्यात, इतके दिवस का गप्प बसल्या होत्या, हाॅट म्हटलं म्हणून काय लगेच लैंगिक अत्याचार झाले का, मग काय आम्ही बायकांशी बोलायचंच नाही का, पुरुष असं करणारच वगैरे प्रतिक्रियांचा मारा अपेक्षेप्रमाणे होऊ लागला. त्या म्हणताहेत ते खरं कशावरून, त्या खुन्नस कशावरून काढत नसतील? खोटे आरोप केले तर पुरुष बिचारा आयुष्यातून उठेल, अशी खुसपटं काढली गेलीत. तुम्ही मोकळंढाकळं वागता, हसता खेळता, मग पुरुषांना असं वागायला आयतं कारण मिळतं, अशी कारणमीमांसाही पुढे केली जातेय. दोष बायकांचाच आहे हा या सगळ्याचा मथितार्थ. दुर्दैवाने बायकाही असं म्हणण्यात मागे नाहीत. आपल्या पुरुषप्रधान आणि पितृसत्ताक समाजात यापेक्षा वेगळं काही अपेक्षित नाही. शतकानुशतकं बाई ही पुरुषाची मालमत्ता, तिच्या शरीरावर त्याचा हक्क, याच कल्पना आपल्याकडे आधारभूत होत्या.

'दिव्य मराठी'त कविता महाजन यांनी त्यांच्या "स्त्री जन्म म्हणोनि न व्हावे उदास' या सदरातून हे विस्ताराने मांडल्याचे वाचकांच्या आठवणीत असेलच. बायका हेच ऐकत, पाहत जगत आल्याने त्यात काय विशेष? असं त्यांना वाटल्यास नवल नाही. त्यात बायकांचा दोष नाही, त्या ज्या समाजात वाढल्या आहेत, त्याचा आहे. पुरुष टक लावून पाहतात यात काही गैर नाही, असं शंभरातल्या ९९ बायकांना वाटतं. कारण त्या हाच अनुभव घेत समाजात वावरत आल्या आहेत. हे चुकीचं आहे असं हाेता कामा नये याची जाणीव मीटू - मीसुद्धा (असा अनुभव घेतला आहे) - मोहिमेने करून दिली. म्हणून ती मोलाची आहे.

आठवडाभरात अनेक बायकांनी आपापल्या कामाच्या ठिकाणी झालेल्या अशा छळाची वर्णनं केली आहेत. त्यातली अनेक निव्वळ अंगावर काटा आणणारी आहेत. त्यातले काही अनुभव वीसेक वर्षांपूर्वीचे आहेत, काही अधिक जुने. त्या काळात पत्रकार महिलांची संख्या फार कमी होती, त्यामुळे या मुली आपापल्या घरच्यांचा विरोध न जुमानता नोकऱ्या करत होत्या. त्यांना असे अनुभव आल्यावर अनेकींनी नोकऱ्याच सोडल्या किंवा सोडाव्या लागल्या. त्या तेव्हा कोणाशीच बोलल्या नव्हत्या असं नाही. अनेकींनी ज्येष्ठ सहकाऱ्यांना अशा घटनांबद्दल सांगितलंही होतं. परंतु त्यांची दाद घेतली गेली नाही. तेव्हा बहुतेक कार्यालयांमध्ये एचआर विभाग नव्हते. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाविषयी कायदा नव्हता. विशाखा मार्गदर्शक तत्त्वं त्या मानाने नंतर आलेली. (अजूनही अनेक संस्था/कार्यालयं/आस्थापनांमध्ये या तक्रारींची चौकशी करणारी समिती नाहीच.) त्यामुळे तक्रारीची तशी तड लागणंही कठीणच होतं. त्यातच हे सर्व पुरुष या महिलांचे "बाॅस' होते. त्यांच्या नोकऱ्या, त्यांना मिळणाऱ्या असाइनमेंट्स, सगळं त्यांच्या हातात होतं. सत्ता हातात असली की माणूस भ्रष्ट होतो म्हणतात, ते वास्तव असल्याचं या सगळ्या प्रकरणांमधून दिसून येतं.

आता काही दिवस अनेक तक्रारी समोर येतील. त्यातल्या काही पोलिसांत जातील. चौकशा होतील. क्वचित कोणाला शासनही होईल. आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या! हे कसं टाळता येईल ते पाहणं ही तातडीची गरज आहे. निव्वळ कायदे करून, पोलिसांत वा न्यायालयात दाद मागून हे प्रश्न सुटणारे नाहीत. एक नक्की की, यामुळे पुरुषांनी घाबरून जायची गरज नाही, तुम्ही कोणत्याही स्त्रीला तिच्या परवानगीशिवाय स्पर्श केला नसेल, तिच्या शरीरावर टिप्पणी केली नसेल, तिला धमकावलं नसेल तर तुम्ही योग्यच वागत आहात. फक्त हे वागणं विशेष नव्हे, तसंच अपेक्षित आहे हे ध्यानात ठेवलं की झालं. मात्र तसं वागत नसाल तर काळजी घ्यायला हवी. आता महिला गप्प बसणार नाहीत.
(दै. दिव्य मराठीच्या ११ आॅक्टोबर २०१८च्या अंकातील अग्रलेख)

Comments