धर्म आणि राजकारण

image source - internet
देशभरात निवडणुकांचा माहोल आहे, शेजारच्या राज्यांत विधानसभेसाठी मतदान सुरू आहे, होणार आहे, निकालांची वाट पाहातायत सगळेच. काही महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील. कदाचित त्यासाेबतच राज्यातल्याही घेतल्या जातील. या पार्श्वभूमीवर “मंदिर वही बनायेंगे’ या नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीच्या वर्षातल्या घोषणेने उचल खाल्लीय. १९९१-९२मध्ये याच घोषणेने देशभरात एक उन्मादी वातावरण तयार झाले आणि डिसेंबरमध्ये अयोध्येतील वादग्रस्त बांधकाम पाडण्यात त्याची परिणती झाली. त्यानंतरचे दोनेक महिने सुरू असलेल्या धार्मिक दंगली आणि मार्चमध्ये मुंबईत झालेले साखळी बाॅम्बस्फोट या घटना ज्यांनी अनुभवल्या त्यांच्यासाठी मंिदर वही बनायेंगे ही घोषणा नव्याने चर्चेत आल्याने, अस्वस्थता निर्माण झालीय. मुंबईच नव्हे तर छोट्यामोठ्या अनेक शहरांमध्ये हजारोंनी हे अनुभव घेतले आहेत. वरचा परभणीतला अनुभव हा अपवाद नव्हे, हे तुम्हालाही पटेल. धर्माच्या नावाखाली नक्की काय चाललंय, याचा अंदाज सामान्य माणसाला येत नव्हता, आता कदाचित येऊ लागलाय. औरंगाबादेत मागच्या आठवड्यात झालेल्या दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिवलमध्ये हुसेन झैदी या मुंबईतील गुन्हेगारीचे वार्तांकन करणाऱ्या व त्यावर पुस्तके लिहिणाऱ्या लेखकाची मुलाखत झाली. त्यात त्याने सांगितलं की, दाऊद आणि छोटा राजन यांच्यातलं वैर धर्मामुळे निर्माण झालं अशी चर्चा सतत होते, हे धादांत खोटं आहे. जेव्हा पोलिसांची/कायद्याची भीती राजनला वाटली तेव्हा त्याने दाऊद देशद्रोही आहे असं सांगून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न केला. नाहीतर तोवर सगळ्या कृष्णकृत्यांमध्ये तो सामील होताच की. ही गोष्ट झाली अट्टल गुन्हेगारांची. पण आज राजकारणीही, अगदी सर्व पक्षांचे, धर्माचा आसरा कधी नि कशासाठी घेतात, हे हळूहळू उघड होतंय. कोणी गोत्राची गोष्ट करतं, कोणी जानव्याची, तर कोणी लवाजमा घेऊन अयोध्येला जातं. दुष्काळ येऊ घातलाय, पाणी आणि चारा या दोहोंसाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होऊ घातलंय, दिल्लीत हजारो शेतकरी त्यांचे प्रश्न सरकारच्या कानावर पडावेत म्हणून मोर्चा घेऊन गेलेत, तरुणांना नोकऱ्या नाहीयेत, या सगळ्यावर यातलं कोणी का नाही बोलत? या गोष्टी इतक्या कमी महत्त्वाच्या असतात का? आपली आर्थिक स्थिती कोणतीही असो, कोणत्याही प्रदेशात आपला निवास असो या गोष्टींचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो, त्याची आपल्याला जाणीव असते. मग राजकारणी आपल्यापेक्षा इतके वेगळे असतात का? का असतात?

Comments